नेहमीचच झालाय

नेहमीचच झालाय,
सगळच हाताबाहेर गेलं
कि जायचं त्याच्याकडे,
कधी रडत, कधी चडफडत,
कधी अगतिकतेने, कधी गरीबासारखे,
कधी भिकारयासारखे, कधी आशेने,
कधी अस तर कधी तसं
जाणे होतच…
मग अनेकदा बोलून दाखवायचं,
सगळा आता तुझ्या चरणी,
तूच काय ते कर बाबा,
सगळी चिंता तुला वाहतो,
तू जे करशील तेच बरोबर असेल माझ्यासाठी.
नंतर हळूच बोलायचं हे हवाय मला. दे रे दे. देरे मला.
नेहमीचच झालाय.

Advertisements

कुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…

Image source: https://www.facebook.com/theprartinc
Image source:
https://www.facebook.com/theprartinc
त्याच्या दर्शनाची ओढ जीवाला नेहमीच वेड लावते.
तो तसाही सर्वत्र असतो, तरीही एका विशिष्ठ देवळात, मंडपात त्याला भेटण्याची तडफड का ?
त्याहूनही महत्वाचं म्हणजे अशा महात्म्य असणाऱ्या ठिकाणी असे दर्शनासाठी तडफडणारे मोठ्या संख्येने धडपडत असतात.
अशा धडपडणऱ्या लोकांना कार्यकर्ते हडतुड करतात, शिवाय अलोट गर्दीची धक्काबुक्की बोनस असतेच.
इतकं सगळं सोसून, तासान तास रांगेत उभं राहून दोन क्षण शांतपणे दर्शन मिळेल, तर तेही नाही.
मग पदरी येते मनाची चडफड.
दर्शनाचं समाधान दूरच पण बाकी मनस्ताप जास्त.
VIP दर्शनाची आस या जीवाला लागते , मग सुरु होतो खेळ ओळखीचा …जितकी ओळख मोठी , तितकी रांग छोटी …
नेमकं काय साध्य करू पाहतोय, घरचा देव कमी महत्त्वाचा का ? की त्याच्या कृपेची प्रचीती येतच नाही ? म्हणून हे अस सगळं का ?
कुठेही करेन मी धावाधाव, पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…
गणित सगळं स्वतचं. स्वतःसाठीचं. काय म्हणायच याला ? स्वार्थ की परमार्थ ?
वेगवेगळ्या धर्मानुसार, जातीनुसार, संप्रदायानुसार, वेगवेगळ्या नावांनुसार, ठिकाणानुसार, स्त्रीलिंगी -पुल्लिंगी असा फरक तर आपण करतोच .
आणि आता मंडळ , देवळं यानुसार पण आम्ही त्याला किती महत्व द्यायचं ते ठरवतो. नेमकं कुठे चाचपडतोय ? नेमकं कुठे चाललोय आपण ? दर्शनाला ? की फक्त देखाव्याचा काळाकुट्ट नाला ?