जीवन मरण – एका भिंतीपलीकडले

मुंबईत तस कोणतही लोकल रेल्वे स्टेशन पाहता इथल्या जगण्याच्या वेगाचा अंदाज सहज येतो. त्यातली गर्दी, रोजची धावपळ, तीच ती वरदळ, गडबड ,गप्पा, आवाजाचा कान्हेर, तिकडेच पोटापाण्यासाठी हातात काहीनाकाही विकणारे , ट्रेन मध्ये चढण्या – उतरण्याची कसरत , घाई , सतत कुठेतरी पोहचायचं असतं हि भावना, एकूणच जगण्यासाठीचा आटापिटा. मग ते मोठं junction असो किवा एका फलाटाच स्टेशन, जगण्याची केविलवाणी हि उठाठेव दोन्हीकडे सारखीच.
पण आजचं हे एक फलाटाच स्टेशन थोडं वेगळं भासलं. इथल्या रेल्वे रुळाला लागुनच एक स्मशान आहे. मोठं स्मशान . मधेच जुनं बांधकाम असलेली थोडी मुघल सारखी वास्तु ,बाजूला पांढऱ्या फुलांनी डवरलेलं एक मोठं झाड , आणि मधेच पसरलेलं आणखी एक मोठ हिरवागार,असं दुसरं झाड . खूप थडगी असावीत.
पण तरीही शांत , निचापित पडलेलं , या स्टेशनच्या कोलाहलापासून एकदम वेगळं.
तिथं दफन केलेली ती सगळी लोक कधीतरी या फलाटावरची एक होती. इथल्या वर्दळीतली, जगण्याची आसक्ती असलेली, तिकडे मात्र सगळं संपलेली. या रेल्वेरुळाला लागून असलेली भिंत त्या स्मशानाला वेगळं करत होती. इथल्या गर्दीतून एक भिंत पार केली कि जगण्यातून मृत्यूपर्यंतचं अंतर संपलेलं. मधूनच एक फास्ट ट्रेन भरदाव निघून गेली. किती विसंगत?
समोरच्या जगण्याच्या बेदरकार वेगात ते मरण मागे तसच शांत, स्तब्ध,निशब्ध, निर्विकार-एका भिंतीपलीकडले

Advertisements