मार्मिक

काही गोष्टी सांगण्यासाठी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागत नाही, मोठमोठ्या उताऱ्यांची पारायणे करावी लागत नाहीत, हेच खरे.

Advertisements

रखडलेले- कारणमीमांसा

अनेकदा लग्नाचं अमुक एक वय गेलं की लोकं रखडलेल्या प्रकारात मोडतात.
का? या अशा उशिरापर्यंत लग्न न होण्याची काय करणे असावीत.
त्याचीच एक सूची बनवावी असा विचार आला आणि कारणे शोधा मोहीम सुरु झाली.
खूपच रोचक पण खरी कारणे सापडली. अर्थात ती इथे मांडणे ओघाने आलेच.

आकडा

तीच्या किंवा त्याच्या वयाचा वाढता आकडा पाहता आई बापाला अनेकदा आकडी येते.

नावात काय असते ? भाग २

नावात काय असते ?- भाग २
तर…
आमच्या इथे नावाचं एक वेगळंच प्रस्थ आहे,
विशेषतः लग्नानंतर मुलीच्या माहेरच्या आडनावाला अंतर देण्याची प्रथा आहे.
पण आता एकदम जन्मानंतरची ओळख हद्दपार काही जणी नाही करत.
म्हणून माहेरचं नाव आडनाव तसच ठेवलं जाते आणि सासरच नाव ही त्यापुढे मोठ्या दिमाखात लावलं जाते .
त्यामुले नाव थोडं लांबतं पण माहेरची ओळख जवळ राहते असं काहीसं लोकांचं म्हणणे पडते.
हे असं लाम्बलेल नाव अनेकदा भारी प्रकरण असते, कधी चमत्कारिक तर कधी विनोदी तर कधी आणिक वेगळं.
म्हणजे नाव आणि दोन आडनावे वेगळा अर्थ देतात नावाला.
काही नमुनेदार उदाहरणं
सौ. मधुरा कडू-गोडसे (मधुरतेने कडू न होता गोडच राहायचं )
सौ. सौजन्या दाबके – धपके ( यमक जुळणारे शब्द )
सौ. अकल्पिता जामसडेकर – भातखंडेकर (नावाची आगगाडी)
सौ. तृप्ती दहिभाते – भेंडे (उत्तम मेनू आणि वर तृप्ती )
सौ. वसुन्धरा डोंगरे – पठारे (भौगोलिक नाव )
सौ. सुवर्णा तांबे -पितळे ( धातूयुक्त नाव )
सौ. पूजा भगत – साधू (श्रद्धाळू नाव)
सौ. योजना व्यवहारे – दलाल (व्यावहारिक नाव )
सौ. नेत्रा माने – पोटे (अवयव विशेष )
सौ. मीनाक्षी मोरे – लांडगे (प्राणी विशेष)
सौ. साक्षी चाचे -गुंड (गुन्हे जगताची साक्ष देणारी )
सौ. आनंदी नाचरे- हसरे ( नावातच खुशी )
सौ. भैरवी सरगम – तबले (नावात संगीत)
सौ. अबोली बोले – गुपचुपे (नेमकं काय बोलायचं )
सौ. समृद्धी साठे रिकामे (सासरी जावून रिते झाल्यासारखे )
हि यादी पुढेही update होतंच राहील. तुम्ही भर घातलीत तर स्वागत आहे. आनंद होईल.

मन की ग्रह ?

मनं जुळली की ग्रह जुळतात,
ग्रह जुळले की मनं जुळतातच, असं नाही.

बस..

Arrange marriage हे बस थांब्यावर बसची वाट पाहण्यासारखे असते. अनेकदा आपल्याला हवी असणाऱ्या बसची किती तरी तास वाट पहावी लागते.
काहीना थांब्यावर थांबावच लागत नाही, आल्याआल्याच पहिल्या बस मध्ये काही चढतात, तर काहींना थोडा वेळ वाट पाहावी लागते.
कधी कधी कुणी ओळखीचं taxi किवा गाडीतून हाथ दाखवून लिफ्ट देतो , म्हणजे थोडसं उशिरा पण नशिबात असलेल्या love marriage सारखे.
काही जण हे बस थांब्यावर येण्याचं कटाक्षाने टाळतात , कारण उनकी मंझिल पाने का जरिया त्यांनी निवडलेला असतो, त्यांना गंतव्य स्थानी नेमक कसं जायचं हे पक्क ठावूक असते . कोणतं वाहन, कोणता रस्ता ,कधी, केव्हा , कसं सगळं ठरलेलं.किंवा आपसूक जमून आलेल्या love marriage सारख. काही मात्र बस थांब्यावरच अडकून बसतात. काहींची दुरवस्था अशी कि नेमकी बस कोणती पकडायची हेही कळत नाही कारण नेमकं पोहचायचं कुठे हे ही माहित नसते.
काही चुकीच्याच बस थांब्यावर थांबून असतात, जिथे जायचय तिथे जाणारी बस तिथे येणारच नसते. हे बहुतेक एकतर्फी प्रेम करणाऱ्यांच आणि इच्छा-अपेक्षांचे इमले बांधणाऱ्याचं होत असावे. त्यांना बहुदा बस सापडतच नाही. कुणाला विचारून योग्य रस्ता धरणारे लोक पण असतात. काही चुकीच्याच बस मध्ये चढतात , पुन्हा उतरतात , पुन्हा नवीन बस पकडतात , कसे बसे आपल्या इस्पित स्थळी पोहचतात. संसाराचा डाव पुन्हा मांडणाऱ्या लोकांप्रमाणे. काही बसची वाट बघून कंटाळून पर्यायी मार्ग अवलंबतात.
पण ज्यांना बस सापडत नाही असे मात्र हाताच्या बोटावर मोजता येणारे …

नावात काय असते ? भाग १

नावात काय असते ?- भाग १

नावात काय असते ? असे “शेकस्पिअर” म्हणुन गेले.पण हे असं लिहिताना त्याच मोठं उत्तरं त्यांनी का नाही लिहिले.
“What’s in a name? that which we call a rose
By any other name would smell as sweet.”
या Quote मध्ये गुलाबाला कुणी दुसऱ्या नावाने संबोधलं असते तरी त्याचा सुवास बदलला नसता असा व्यापक अर्थ दिसतो.
पण नावात खूप काही असते हे आमच्या इथे दिसते कारण आमच्या इथे नावात विश्व वसते.
आडनाव सांगितलं कि नेमके कुठचे ?हा जोड प्रश्न येतो.
लग्न प्रकरणी ‘नाव’ अनेकदा एक प्रकरण असते. राशीतले नाव आणि मुळचे गाव हे खूप महत्वाचे बरे.
अनेकदा नाव ऐकून नाक मुरडणारे हि असतात, म्हणजे स्थळ आलं कि वर किवा वधू चं नाव, तिचं किवां त्याचं आडनाव अनेकदा चेष्ठेचा विषय ठरतो .
काही नाव किती राजेशाही असतात किवा काही किती गांव्नढळ असतात. काही अगदीच सामान्य तर काही उच्चारणासाठी खूप कठीण.
समोरचा ते नाव आयुष्यभर स्वतःची ओळख घेवून वावरतो पण अशा नावांना दुसरा पक्ष विनासायास नाव ठेवतो. हि एक गंमतच.
आपल्याकडे मुली लग्नानंतर मुलाचं नाव आणि आडनाव आपल्या नावापुढे लावते, बहुत ठिकाणी मुलीच नावहि बदललं जाते. सगळी ओळख नवी … इतकी वर्षे जे नाव घेवून जगलो ते एका क्षणात नेस्तनाबूत होते.
तेव्हा कधी कधी खरच असं वाटते कि नावात काय असते ?

गोरी गोरी पान फुलासारखी छान ???

गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी आण…
अतिशय लोकप्रिय आणि सर्व मान्य मराठी बालगीत…आणि लग्नाळू दादाला चिडवण्यासाठी आणि मस्ती करण्यासाठी सरास गायले जाणारे गाणे.इतक्या वर्षात असं का कधी कुणाला वाटला नाही कि यातला भावार्थ आपल्या मानसिकतेवर हळूच बोट ठेवत…
सावळी, थोडी नाही दिसायला छान अशी मुलगी कुणाची कधी वाहिनी म्हणून हवी असूच शकत नाही. ग. दि. माडगूळकरंनी नेमकी समाजाची नस ओळखली आहे.
बायकोचा वर्ण गोरा हवा, हि अनेकदा गरजेची आणि महत्वाची गोष्ट असते मुलगी पसंद करताना. भारतात राहून असा पांढरा मासाचा गोळा सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असावा अशी बिनडोक अपेक्षा कशी काय लोक बाळगतात. इथल्या हवामानात त्वचेचा वर्ण युरोप खंडात आढळणाऱ्या श्वेत कांती प्रमाणे भासावा अशी रम्य कल्पना करणारे इथे कमी नाहीत.
प्रथमदर्शनी केवळ रंग काळा म्हणून कुणाला लग्न बाजारात कमी भाव मिळतो हि किती शोकांतिका!अनेकदा ‘तो’ डार्क असणे चालवून घेतले जाते, किवा तो त्याच्या बाबतीत वादाचा मुद्दाच असू शकत नाही पण तीचा उजळ नसलेला रंग सहज नाकारला जातो.तरीही अनेकदा शिक्षण, संस्कार, स्वभाव, तिचं किवा त्याचं आर्थिक स्वावलंबन त्या काजळीत काळवंडून जाते.

लाडू कधी देणार?

काही प्रश्न काही प्रश्नांना संलग्न असतात.लग्न प्रकरणी तर असे अनेक प्रश्न हातात हात घालून समोर येतात, आणि नंतर हात धुवून मागेच लागतात.
समोरच्याच्या लेखी उपवर मुलगा किंवा मुलगी समोर आली कि ती व्यक्ती प्रश्न विचारते (चांभार चौकश्या करते), याला विचारपूस म्हणतात. ‘शिक्षण झालं ? , ‘कामधंद्याची माहिती’ झालंच तर अगोचरपणे ‘तरी साधारण किती पगार आहे ?’इथवर सवाल जवाब कार्यक्रम आटोपला कि पुढे लोकं diabetic होतात आणि त्यांची गोडाची इच्छा प्रबळपणे जोर धरू लागते अन शेवटी हक्काने लोक लाडू मागतातच.
कधी कुतूहलाने ,कधी माहितीपोटी, कधी काहीही विचारायचं म्हणून , कधी मस्करीने , कधी काळजीने तर कधी खोचकपणे ‘लाडू कधी देणार ?’हा प्रश्न सर्रास विचारला जातो.
का ? कशासाठी ?
आणि या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर अपेक्षित असतं समोरच्याला ? का लोकांना दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसायची जणू सवयच असते ? वरकरणी जाणवत नसल्या तरी काही गोष्टी खाजगी so called personal असू शकतात इतका सोप्पा विचार मनात येत नाही.
बर , हा प्रश्न कोणीही विचारू शकतं , दूरच्या नात्यातले काका किवा राहत्या सोसायटी मधल्या वरच्या मजल्यावरचे आजोबा , just ओळखीच्या मावशी , किवां रस्त्यात अचानक भेटलेल्या शाळेतल्या बाई , किवा नुकताच लग्न करून settle झालेला मित्र किवां मैत्रीण . प्रश्न विचारणारे कुणीही असू शकतात, हे लोक कुठेही गाठून हा प्रश्न विचारतत अगदी चारचौघात सुद्धा.
विचारणारी तोंड वेगळी , रूपं वेगळी , भाव वेगळा , स्वर वेगळा , काळ ,स्थळ तेही बदलणारे
पण प्रश्न मात्र तोच. अनुत्तरीत

लग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते?

अमुक त्याचं लग्न लवकर झालं किंवा तमक्याचं लग्न उशीरा झालं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमका कोणता निकष लावला जातो? वय ?
लग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते? संविधानाने कायद्यात तरतूद केलेले? वैद्यकीय भाषेत आरोग्यशास्त्र ठरवते ते?
कि समाजाने ठरवलेले ?
कुणी तरी आवडलं आणि आता आयुष्यभराची साथ हक्काने त्याचं व्यक्तीने द्यावी यासाठीचे प्रयोजन म्हणजे लग्न वेळ? कि आसपासचे समवयस्क लग्न करू लागले कि समजावे, आता लग्न करायला पाहिजे.