जीव निर्जीवातला

असं होतच सगळ्यांच्या बाबतीत…
किती तरी गोष्टींमध्ये जीव गुंतून जातो. पेन, कंपास पेटी, तीच ती बसायची खुर्ची, एखादा मनापासून आवडलेला लकी शर्ट, डायरी, पाणी पिण्यासाठी तोच तो स्वतःचा स्वतंत्र ग्लास, रेडिओ, जुनी खेळणी, वगैरे . अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये आपला जीव आपल्या नकळत अडकून जातो. अशी वस्तू हरवली, तुटली, बिघडली किंवा त्या वस्तुचं काही बर-वाईट झालं की मात्र मनही हळवं होतं. ती वस्तू गेल्याचं दुःख अनेकदा अनावर होतं. अश्रूही असतात साथीला. काहीतरी विपरीत घडलं , जीवनात नसती पोकळी झाल्याचा भाव निर्माण होतो.
अनेक वर्ष होवूनही ती वस्तू सोबत नसल्याची जाणीव असते. त्या वस्तूवरील प्रेमाचे न विरहाचे किस्से अनेकदा लोकांना सांगतो. ती वस्तू आठवण म्हणून मनात कायमची घर करून गेलेली असते. कधी काळी जीवापाड जपलेली ती वस्तू आपल्याबरोबर नाही, याची खंत राहतेच.
का? कशासाठी?
अशा वस्तूंवर इतकं प्रेम?
हाडा-मासाच्या माणसांवरही असा लोभ जडत नाही अनेकदा. जीवंत माणसे, आसपास असताना दुःखाचे कारण बनतात अनेकदा . दुखावले जातो आपण अनेकदा .
निर्जीव वस्तुंच बरं असते, त्या आपल्याला तसा त्रास देत नाहीत, त्यांच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात. आपल्याला हव तस त्यांना वापरता येते, ठेवता येते .
म्हणून कदाचित त्या सतत हव्या हव्याशा वाटतात. त्यांची साथ- सोबत हवीशी वाटते.
गंमत आहे न? विचार केला तर आपला जीव अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये कितींदा अडकलाय याची एक यादी नक्की बनेल.

Advertisements

जीवन मरण – एका भिंतीपलीकडले

मुंबईत तस कोणतही लोकल रेल्वे स्टेशन पाहता इथल्या जगण्याच्या वेगाचा अंदाज सहज येतो. त्यातली गर्दी, रोजची धावपळ, तीच ती वरदळ, गडबड ,गप्पा, आवाजाचा कान्हेर, तिकडेच पोटापाण्यासाठी हातात काहीनाकाही विकणारे , ट्रेन मध्ये चढण्या – उतरण्याची कसरत , घाई , सतत कुठेतरी पोहचायचं असतं हि भावना, एकूणच जगण्यासाठीचा आटापिटा. मग ते मोठं junction असो किवा एका फलाटाच स्टेशन, जगण्याची केविलवाणी हि उठाठेव दोन्हीकडे सारखीच.
पण आजचं हे एक फलाटाच स्टेशन थोडं वेगळं भासलं. इथल्या रेल्वे रुळाला लागुनच एक स्मशान आहे. मोठं स्मशान . मधेच जुनं बांधकाम असलेली थोडी मुघल सारखी वास्तु ,बाजूला पांढऱ्या फुलांनी डवरलेलं एक मोठं झाड , आणि मधेच पसरलेलं आणखी एक मोठ हिरवागार,असं दुसरं झाड . खूप थडगी असावीत.
पण तरीही शांत , निचापित पडलेलं , या स्टेशनच्या कोलाहलापासून एकदम वेगळं.
तिथं दफन केलेली ती सगळी लोक कधीतरी या फलाटावरची एक होती. इथल्या वर्दळीतली, जगण्याची आसक्ती असलेली, तिकडे मात्र सगळं संपलेली. या रेल्वेरुळाला लागून असलेली भिंत त्या स्मशानाला वेगळं करत होती. इथल्या गर्दीतून एक भिंत पार केली कि जगण्यातून मृत्यूपर्यंतचं अंतर संपलेलं. मधूनच एक फास्ट ट्रेन भरदाव निघून गेली. किती विसंगत?
समोरच्या जगण्याच्या बेदरकार वेगात ते मरण मागे तसच शांत, स्तब्ध,निशब्ध, निर्विकार-एका भिंतीपलीकडले

बातमी आक्रोशाची

सकाळी सकाळी तसाही TV पहायचा वेळ नसतोच. पण आज घरात TV चालू होता आणि त्यावर बातम्यांची वाहिनी.
राशिभविष्य , शुभ सकाळ , TOP २० -५० झटपट बातम्या किंवा ब्रेंकिंग न्यूज असं काहीस सकाळच्या बातम्यांचं स्वरूप असते .
आजची hilighted बातमी क्लेशकारी होती. तशा बहुतांश बातम्या मानसिक त्रासच देतात पण आजची बातमी मनस्ताप करून देणारी .
भारतीय सरहद्दीवर एका शूर कर्नलने आपल्या प्राणांची आहुती दिली.शहीद संतोष महाडिक यांची शोर्य गाथा आणि त्यांचं पार्थिव त्यांच्या गावात दाखल. पण त्यानंतर चे त्या बातमीचे ते live broadcast असह्य झालं .
त्या पार्थिवा समोर धायमोकलून रडणारे चेहरे बघून सुन्न झालं मन. त्यांचा तो आक्रोश , ती शोकाकुल अवस्था बातमी बनू शकते?
का? कशासाठी ? खरच गरज असते का त्याची? कुणाचं दुःखं असं शूट करून काय पोचवायच असतं या वाहिन्यांना ? कि असं भेदक, भकास स्वरूप दाखवलं तरच TRP वाढतो कि जनमानस कळवळून जागा होतो? नेमकं काय सांगायचं या बातम्यांना ?
भावनांचा बाजार नुसता.